जळगाव मिरर | १४ जुलै २०२६
जळगाव शहरात अमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत मध्यरात्रीच्या सुमारास एमडी (मॅफेड्रोन) ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना रंगेहाथ अटक केली. या कारवाईत तब्बल ३ लाख रुपये किमतीचे ५६.२९ ग्रॅम मॅफेड्रोन (एमडी) ड्रग्ज जप्त करण्यात आले. मात्र, कारवाईची चाहूल लागताच या प्रकरणातील मुख्य ड्रग्ज पेडलर भैय्या सोनवणे अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाला. त्याचा पोलिसांकडून युद्धपातळीवर शोध सुरू असून त्याच्या कांचननगर येथील घराचीही झाडाझडती घेण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील शासकीय तांत्रिक विद्यालयाशेजारी असलेल्या जी.एस. ग्राऊंडच्या प्रवेशद्वाराजवळ मध्यरात्री सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास ड्रग्जची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून छापा टाकला. या कारवाईदरम्यान जयेश देविदास तायडे (वय २७, रा. हरीओम नगर) आणि हितेंद्र शिवाजी परदेशी (वय ३१, रा. कांचननगर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ५६.२९ ग्रॅम वजनाचे, सुमारे ३ लाख रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले. मात्र, मुख्य पुरवठादार भैय्या सोनवणे हा पोलिसांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.
अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता, जप्त करण्यात आलेले एमडी ड्रग्ज हे भैय्या सोनवणे यानेच विक्रीसाठी पुरविल्याची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने भैय्या सोनवणेच्या कांचननगर येथील घरावर धाड टाकून झाडाझडती घेतली. या झाडाझडतीत काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याची माहिती समोर येत असून, फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. फरार आरोपीला अटक झाल्यानंतर या रॅकेटमधील आणखी काही संशयितांची नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.




















