जळगाव मिरर | २ ऑक्टोबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात आज देखील बिबट्याची दहशत कमी झालेली नसताना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात रविवारी रात्रीच्या सुमारास एक थरारक घटना घडली. अवसरी गावातील एका वस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या शिरला. यावेळी घरासमोर झोपलेल्या कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या थरारक घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे.
बिबट्याने कुत्र्याची शिकार करतानाचा थरार समोर आल्याने अनेकांना धडकी भरली आहे. वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्यातील अवसरी गावात दत्तात्रय चव्हाण या व्यक्तीचे घर आहे.
त्यांच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये रात्रीच्या सुमारास पाळीव कुत्रा झोपला होता. दरम्यान, कुत्रा गाढ झोपेत असताना अचानक बिबट्या शेडमध्ये आला. त्याने कुठलाही आवाज न करता अगदी दबक्या पावलांनी जात कुत्र्याची मान पकडली.
बिबट्याच्या जबड्यातून आपली मान सोडवण्याचा कुत्र्याने प्रयत्न केला. मात्र, यामध्ये तो अयशस्वी ठरला. अखेर बिबट्याने कुत्र्याला घेऊन शेडमधून पळ काढला. हा थरारक प्रकार घरासमोर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आंबेगाव तालुक्यातील याच ठिकाणी बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.