जळगाव मिरर | ३ ऑक्टोबर २०२३
ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा दोन महिन्यांमध्ये व्हॉट्सअपने भारतातील तब्बल १ कोटी ४६ लाख ४८ हजार खाती बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी ७४ लाख २० हजार खाती ऑगस्ट महिन्यातील आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्स अॅपद्वारे गैरप्रकार करणाऱ्यांवर रोजच्या रोज कारवाई करण्यात येते. यामध्ये काही खात्यांवरील कारवाई तक्रारींच्या आधारे, तर काहींवरील कारवाई थेट करण्यात येते. ऑगस्टमध्ये कोणत्याही तक्रारीशिवाय व्हॉट्सअॅपने तब्बल ३५ लाख खाती बंद केली, तर सप्टेंबरमध्ये हे प्रमाण ३ लाख १० हजार एवढे होते. ऑगस्टपेक्षा सप्टेंबरमध्ये बंद करण्यात आलेल्या एकूण व्हॉट्सअॅप खात्यांची संख्या कमी असून ती ७२ लाख २८ हजार एवढी आहे.
गैरप्रकारविरोधी कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी व्हॉट्सअॅपने आयटी अभियंते, डाटा सायंटिस्ट, अॅनालिस्ट, संशोधक अणि तज्ज्ञांची नियुक्ती केली आहे. ही टीम आयटी कायद्याच्या अंमलबजावणीबरोबरच खातेधारकांची ऑनलाइन सुरक्षितता आणि तंत्रज्ञानविषयक सुधारणांबाबत प्रयत्न करत असते, अशी माहिती व्हॉट्सअॅपचे संचालन करणारी कंपनी मेटाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. भारत सरकारने यावर्षी बंद करण्यात आलेल्या व्हॉट्सअॅपधारकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी समिती स्थापन केली असून त्यासाठी ऑनलाइन तक्रारी दाखल करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.