जळगाव मिरर | ५ ऑक्टोबर २०२३
तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची एक ह्रदयद्रावक बातमी समोर येत आहे. हि घटना अहमदनगर जिल्हयातील खेड तालुक्यातील खर्डा येथे घडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या मृतांमध्ये दोन मुले आणि मुलीचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथून भुमकडे जाणाऱ्या शिर्डी- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गा लगत असलेल्या पाझर तलावावर आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुले व एका मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सुदैवाने एका वाटसरूच्या धाडसामुळे यातील मुलांच्या आईचा जीव वाचवण्यात यश आले आहे. दहावीत शिकणारा कृष्णा परमेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे), दिपक ज्ञानेश्वर सुरवसे (वय १६ वर्षे) तर आठवीत शिक्षण घेत असलेली सानिया ज्ञानेश्वर सुरवसे (वय १४ वर्षे) अशी या मृत मुलांची नावे आहेत. यामध्ये सानिया आणि दिपक हे सख्खे भाऊ- बहिण आहेत.
सुरूवातीला पाय घसरून पडल्याने मुलगी पाण्यात बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी दोन्ही मुले पाण्यात उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तिही बुडू लागली. त्या तिघांना वाचवण्यासाठी मुलांची आई रुपाली ज्ञानेश्वर सुरवसे पाण्यात उतरली. मात्र तिही बुडत असताना आरडाओरडा केल्याने रस्त्यावरून जाणारे सरपंच बिबिषन वाघमोडे, चांद पठाण, भाऊसाहेब दिगंबर वाळुंजकर यांच्यामुळे तिचा जीव वाचला. या घटनेनंतर एकाच चितेवर तिन्ही भावंडांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटूंबियांनी केलेला आक्रोश काळीज चिरडुन टाकणारा होता. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून कुटूंबियांवर दुखःचा डोंगर कोसळला आहे.