जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२३
चोपडा तालुक्यातील बिडगाव येथून जवळच असलेल्या चिंचपाणी धरणात पोहण्यासाठी गेलेला पिंटू पावरा हा तरुण धरणात बुडाला. ही घटना मंगळवारी दि.१० दुपारी १२ वाजता घडली. मात्र पिंटूचा तपास रात्रीपर्यंत लागलाच नाही. यामुळे एन. डी. आर. एफ. च्या टीमला पाचारण करून बुधवारी सकाळी त्याचा शोध घेतला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिडगावपासून जवळच असलेल्या बढाई येथील पिंटू डोंगरसिंग पावरा ( वय ३८) हा तरुण सहकाऱ्यांसह चिंचपाणी धरणात पोहण्यासाठी गेला होता. तो पोहत असताना अचानक पाण्यात बुडाला. त्यामुळे घाबरलेल्या सहकाऱ्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो आढळून आला नाही. यावेळी कुंड्यापाणीचे पोलिसपाटील मुसा तडवी, बिडगावचे पोलिसपाटील रामकृष्ण पाटील हे घटनास्थळी लगेचच हजर झाले.
या घटनेची माहिती अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा यांना देताच त्यांनी उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील, सहायक उपनिरीक्षक सुनील तायडे यांच्यासह घटनास्थळी लगेच भेट देऊन पाहणी केली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनाही कळविले. धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असल्याने पिंटूचा शोध घेणे कठीण झाले. रात्री धरणावर नातेवाईक व कुटुंबातील सदस्य ठाण मांडून बसले होते.