
जळगाव मिरर | ३० जून २०२६

भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रूक शिवारात शेतात तुर पेरणीचे काम करत असताना अचानक वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (दि. २९) दुपारी सुमारे ३ वाजता घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत तरुणाचे नाव खिलेश किशोर कोळी (वय २१) असे असून तो कठोरा बुद्रुक येथील गट क्रमांक ६० मधील शेतात वडील व मजुरांसोबत तुर पेरणीचे काम करत होता. सकाळपासून कपाशी व व तुर पेरणी तसेच ट्रॅक्टरने शेतात सऱ्या पाडण्याचे काम सुरू होते.
दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन ढगाळ आकाश, जोरदार वारे आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. सुरुवातीला रिमझिम पाऊस सुरू असतानाच अचानक विजेचा जोर वाढला. याचवेळी खिलेश शेतात काम करत असताना त्याच्या खांद्यावर वीज कोसळली आणि तो जागीच कोसळून बेशुद्ध झाला. घटनेनंतर उपस्थित वडील व मजुरांनी प्रसंगावधान राखत त्याला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले.
मात्र, तेथे उपस्थित डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. वरणगाव परिसरातही या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतीकामासाठी गेलेला तरुण परत न आल्याने गावात शोककळा पसरली आहे. खिलेश कोळी हा कोटो येथे अप्रेंटिसशिपचे प्रशिक्षण घेत होता आणि भविष्यात कुटुंबाला आधार देण्याचे त्याचे स्वप्न होते. त्याच्या अकाली निधनाने एक होतकरू तरुण हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे. प्रशासनाकडून पुढील कार्यवाही सुरू असून परिसरात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे.





















