जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२३
अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारीच्या घटनेना घडत असतांना एक मोठी बातमी नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे. एका लष्करातील निवृत्त जवानाची मद्यपी तरुणांनी हत्या केल्याची घटना म्हसरुळ-आडगाव लिंक रोडवर घडली आहे. याप्रकरणी म्हसरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मिळालेल्या माहितीनुसार, रवीदत्त राजेंद्र चौबे (वय ४२) हे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सहकुटुंब कारने जात होते. त्यावेळी सुरभी कंपनीसमोर दोन तरुण मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घालत होते. त्यांनी आरडाओरड करीत वाहतूक अडवली. त्यामुळे चौबे यांनी दोघांचा पाठलाग केला. मात्र त्यापैकी एकाने चौबे यांच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने चौबे गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती म्हसरुळ पोलिसांना मिळाली त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौबे यांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.