जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२६
धान्य खरेदीसाठी त्याची रक्कम दिल्यानंतर मका न पाठविता पी. व्ही. सुरेश (रा. चेन्नई) या व्यापाऱ्याची २१ लाख ९४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. ही घटना दि. २८ सप्टेंबर ते दि. १५ ऑक्टोबर दरम्यान घडली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेन्नई येथील धान्य व्यापारी पी. व्ही. सुरेश यांना फेसबुकवर एक पोस्ट दिसली. त्यामध्ये असलेल्या मोबाईल क्रमांकावर श्यामलाल नामक व्यक्तीशी त्यांनी संपर्क साधला असता त्याने अमळनेर येथे मका असल्याचे सांगितले. त्यामुळे व्यापारी अमळनेर येथे आले होते. अमळनेर येथील गोदामाजवळ विशाल शुक्ला व अविनाश पाटील हे दोन जण भेटले. त्यांनी सुरेश यांना मका दाखविला व तो घेण्याची व्यापाऱ्याने तयारी दर्शविली. त्यासाठी श्यामलाल यांना २१ लाख ९४ हजार ४४० रुपये पाठविले होते.
व्यापाऱ्याने श्यामलाल यांना पैसे पाठविले, मात्र अमळनेर येथे असलेल्या दोन जणांनी ही रक्कम आम्हाला मिळाली नसल्याचे सांगत मका देण्यास नकार दिला. त्यामुळे व्यापाऱ्याने श्यामलाल यांच्याशी संपर्क साधला असता तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. या प्रकरणी पी. व्ही. सुरेश यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून श्यामलाल, विशाल शुक्ला (रा. नागपूर), अविनाश पाटील या तिघांसह बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर करत आहेत.





















