जळगाव मिरर । १२ डिसेंबर २०२३
जळगाव शहरातील समता नगरातील २८ वर्षीय अरुण बळीराम सोनवणे या तरुणाचा वंजारी टेकडीवर निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी सुरूवातीला जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून अटक केली होती तर दुसर्या संशयिताला नेपानगरात जळगाव एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यातील संशयित आरोपी अशोक महादु राठोड (वय ३२ ) याला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील समता नगर परिसरातील वंजारी टेकडी भागात खून करून पसार झालेला संशयित अशोक महादू राठोड हा नेपानगरात असल्याची एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पथकाला कारवाईचे आदेश दिले. विशेष पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राठोड, किशोर पाटील, नाना तायडे, किरण पाटील, रामानंदनगर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक हेमंत कळसकर, विजय जाधव आदींनी ही कारवाई केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
तरुणाच्या खून प्रकरणी गोकुळ बळीराम सोनवणे (31, समतानगर, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून संशयित सोनू आढाळे, पप्पू आढाळे, बळीराम चव्हाण, अशोक राठोड आणि योद्धा उर्फ पिंट्या शिरसाठ अशा पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात खून व प्राणघातक हल्ला या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन संशयितांना अटक करण्यात आली असून अन्य संशयितांचा कसून शोध सुरू आहे. तपास सहा.पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील करीत आहेत.