जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२३
परधाडे ते माहेजी रेल्वे स्थानका दरम्यान धावत्या रेल्वेसमोर आल्याने तालुक्यातील दहिगाव संत येथील ४२ वर्षीय विधवा महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि.१७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटने प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माहेजी ते म्हसावद रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे कि. मी. खंबा क्र. ३९२ / २५ / २७ नजीक एका महिलेचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती रेल्वे गाडी क्र. १२५१९ चे लोकोपायलट यांनी वॉकी टॉकीद्वारे म्हसावद रेल्वे स्टेशन मास्तर यांना दिली.
सदरची माहिती पाचोरा रेल्वे स्थानकाचे स्टेशन उपप्रबंधक विशाल कुमार यांना देण्यात आली. विशाल कुमार यांनी सदरची खबर पाचोरा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल सुर्यकांत नाईक हे रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांचेसह घटनास्थळी दाखल होवून घटनास्थळाचा पंचनामा केला असता मयत महिलेचे नाव अर्चना दिपक पाटील (वय ४२) रा. दहिगाव संत ता. पाचोरा असे असल्याचे समजले. त्यानंतर मृतदेह रुग्णवाहिका चालक किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. मयत अर्चना पाटील यांच्या पतीचे निधन झाले असून त्यांचे पाश्चात्य वृद्ध आई, वडिल व एक मुलगी आहे.