जळगाव मिरर | २३ डिसेंबर २०२३
सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने भुसावळ विभागातून धावणाऱ्या अनेक विशेष गाड्यांच्या मुदतीत वाढ केली आहे. बडनेरा- नाशिक, बडनेरा मेमू, नागपूर- मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेससह पाच विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे. आगामी नाताळ व इतर सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, ३० डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११३९ नागपूर- मडगाव विशेष आता ३० मार्च २०२४ पर्यंत धावणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेली ०११४० मडगाव- नागपूर विशेष ३१ मार्चपर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण ५२ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ०१४३९ पुणे- अमरावती द्विसाप्ताहिक विशेष आता ३१ मार्च २०२४ पर्यंत, तर ०१४४० अमरावती- पुणे विशेष रेल्वे १ एप्रिलपर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्याही अप व डाऊन मार्गावर एकूण ५२ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ०२१३९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- नागपूर विशेष रेल्वे आता १५ फेब्रुवारीपर्यंत, ०२१४० नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष रेल्वे १७ फेब्रुवारीपर्यंत धावणार आहे. या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण २८ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ०२१४४ नागपूर- पुणे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १५ फेब्रुवारीपर्यंत, तर ०२१४३ पुणे- नागपूर साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला १७ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
या गाड्यांच्या अप व डाऊन मार्गावर एकूण १४ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. बडनेरा- नाशिक- बडनेरा मेमूच्या १८२ फेऱ्या वाढल्या. बडनेरा ते नाशिक या दोन स्थानकांदरम्यान धावणऱ्या बडनेरा नाशिक- बडनेरा विशेष मेमूच्या १ जानेवारी ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत १८२ फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत अधिसूचित असलेल्या ०१२११ बडनेरा नाशिक विशेष गाडीला ३१ मार्चपर्यंत, तर ०१२१२ नाशिक- बडनेरा विशेष गाडीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.