जळगाव मिरर | २ जानेवारी २०२४
देशभरात नव्या वर्षाची सुरुवात झाली असून मात्र बदलत्या हवामानामुळे देशातील अनेक राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. येत्या पुढील ४८ तासांत कोकण, विदर्भ मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच सध्या राज्यात थंडीचा जोर ओसरला आहे. अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तापमानाचा पारा 10 अंशांच्या वर गेला आहे.
सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वाऱ्यांमुळे आठवड्याच्या मध्यापासूनच राज्यावर पावसाचे ढग दिसतील. आठवडाअखेरीस या प्रणालीला वेग येणार असून, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दरम्यान, पावसामुळे हवेत गारवा राहण्याचा अंदाज आहे.
सध्या राज्यात कुठे ऊन, कुठे थंडी तर कुठे पाऊस असे हवामान तयार झाले आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात वाढ होणार आहे. त्यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे. तर विदर्भाच्या पूर्व भागात मात्र थंडीचा कडाका कायम राहणार आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.