जळगाव मिरर | २ फेब्रुवारी २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असतांना मनाला धक्का देणारी बातमी लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील तुंगी गावातून समोर आली आहे. या गावातील मोठ्या भावाने आपल्या आईच्या मदतीने सख्या लहान भावाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत योगेश जाधव (वय २३) या तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सखोल चौकशीनंतर आई आणि मुलावर कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. २८ जानेवारी रोजी ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन जाधव या तरुणाने औसा पोलीस ठाण्यात भावाने आत्महत्या केल्याची माहिती दिली होती. माझा भाऊ योगेशने शेतातील पत्र्याच्या शेडला लटकून गळफास घेत आत्महत्या केली आहे, असं त्याने म्हटलं होतं. त्यामुळे पोलिसांनी योगेश अकस्मात मृत्यूची नोंद केली.
पुढे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहाणी केली. त्यावेळी चौकशी करताना त्यांना संशयास्पद गोष्टी जाणवल्या. त्यावर पोलिसांनी तपासाची सूत्र आणखी फिरवली आणि सत्य समोर आलं. योगेश सतत दारू पिऊन यायचा. घरामध्ये भांडणं करायचा त्यामुळे त्याच्या आईने आणि भावाने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. दोघांनी मिळून त्याला बेदम मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. ही हत्या नसून आत्महत्या आहे हे भासवण्यासाठी या दोघांनी बनाव रचला. आधी त्यांनी शेतात फाशी घेताना वापरली जाणारी दोरी लटकवली आणि योगेशला देथे नेऊन गळफास दिल्यासारखे भासवले. पोलिसांनी आता आई आणि भावला ताब्यात घेतलं आहे.