जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२४
तिसऱ्या मजल्यावर साफसफाई करतांना तोल जावून खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या मनिषा श्यामकांत बाविस्कर (वय ३०, रा. श्रीरत्न कॉलनी) यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळच्या सुमारास पिंप्राळा परिसरात घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील श्रीरत्न कॉलनीत मनिषा बाविस्कर या कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्या एस.टी. वर्कशॉपमध्ये नोकरीला होत्या. शनिवारी त्यांना सुट्टी असल्याने त्यांच्या घरातील तिसऱ्या मजल्यावर त्या काम करीत होत्या. सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास तिसऱ्या मजल्यावरील खिडकीची काच पुसत असतांना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या खाली कोसळल्या. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ खासगी रुग्णाल्यात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.