जळगाव मिरर | २२ मार्च २०२४
देशात लोकसभा निवडणुक सुरु झाली असून त्यापूर्वीच मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली आहे. केजरीवाल यांच्या अटकेवरुन विरोधकांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला अटक करणे हे अत्यंत चुकीचे असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु असल्याचं यातून स्पष्ट दिसून येत आहे, अशी टीकाही शरद पवार यांनी केंद्र सरकारवर केली आहे. आम्ही मोठ्या ताकदीने अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहू. याची किंमत भाजपला आणि केंद्र सरकारला मोजावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं. आतापर्यंत देशात काही अपवाद सोडले तर निवडणुका या अतिशय मोकळ्या वातावरणात झाल्या आहेत. मात्र यावेळेसची निवडणूक कशी होईल याची शंका आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर सध्या सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. काँग्रेसची बँक खाती गोठवल्याने त्यांची प्रचार यंत्रणा थांबली आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं.
अरविंद केजरीवाल यांच्या अटकेबाबत बोलताना त्यांनी म्हटलं की, प्रत्येक राज्यात मद्य धोरण असतं. हे धोरण ठरवण्याचा अधिकार राज्य मंत्रिमंडळाला असतो. त्यामुळे अरविंदर केजरीवाल यांना अटक करणे अत्यंत चुकीचे आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं. केजरीवाल अटक झाली मात्र पुढील निवडणुकीत त्यांच्या १०० पेक्षा जास्त येतील एवढं मात्र नक्की. दिल्लीतील लोक केजरीवाल यांच्या बाजूने कौल देतील, असा दावाही शरद पवार यांनी केला आहे.
