जळगाव मिरर | २२ मार्च २०२४
गेल्या चार दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या वाळुजमध्ये एका व्यापाऱ्याचा खून झाल्याची घटना घडली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. या संपूर्ण हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात शहर गुन्हे शाखेला यश आले असून पोलिसानेच व्यापाऱ्याला गोळी झाडून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळुज एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत १७ मार्च रोजी व्यापारी सचिन नरोडे याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत होते. या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली असून अनैतिक संबंधांच्या संशयातून पोलीस हेडकॉन्स्टेबलनेच ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामेश्वर काळे याला व्यापारी सचिन नरोडे याचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने ही हत्या करण्याचा कट रचला. मागील अनेक दिवसांपासून व्यापारी सचिन नरोडे यांच्या मागावर आरोपी रामेश्वर काळे होता. घटनेच्या दिवशी रविवारी रात्री साजापूर परिसरातील वीज गेली होती. त्याच अंधाराचा फायदा घेत आरोपीने कपाळावर गोळी झाडून व्यापाऱ्याला संपवले.
दरम्यान, या प्रकरणी ग्रामीण दलात कार्यरत असलेला हेड-कॉन्स्टेबल रामेश्वर काळे यांच्यासोबत अजून एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हा हेडकॉन्स्टेबल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एका कारवाईत निलंबित होता. त्याच्यावर 354 प्रमाणे देखील गुन्हा दाखल आहे.
