जळगाव मिरर | २३ मार्च २०२४
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना श्रद्धांजली म्हणून दरवर्षी 23 मार्च हा दिवस शहीद दिवस म्हणून पाळला जातो या अनुषंगाने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयात कारगिल युद्धात वीर मरण पावलेल्या वीर उस्मान शेख यांच्या पत्नी फरीदा शेख तसेच शहीद जवान नरेंद्र महाजन यांच्या पत्नी अर्चना महाजन या शहीद सैनिकांच्या “वीरपत्नी”चा सन्मान करत शहीद दिन साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, अकॅडेमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत व जी. एच. रायसोनी कनिष्ट महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. सोनल तिवारी हे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, जवान हे कुटुंबियांना विसरून देशासाठी कायम लढत असतात. त्यांचे जाणे हे अनपेक्षित असते मात्र, ते देशाकरिता शहीद झाले ही बाब कायम अभिमान देते. सीमेवर लढत असताना जवान कोणत्याही संकटाला सामोरे जातात. त्यांच्यातील धैर्य आणि शौर्याचा अभिमान देशातल्या प्रत्येक नागरिकाला असायला हवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यानंतर मनोगत कार्यक्रमात वीरपत्नी फरीदा शेख व वीरपत्नी अर्चना महाजन यांनी म्हटले कि, जेव्हा समाजात वीरपत्नी म्हणून वावरतो तेव्हा देशासाठी कुटुंबातील एक व्यक्ती शहीद झाल्याचा अभिमान आमच्यात असतो. हाच अभिमान आमची हिंमत वाढविण्यास पुरक ठरतो, देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक कधीही कुटुंबियांची काळजी करीत नाही. त्यांच्या मनात कायम देशसेवेची भावना असते. घरातील व्यक्ती देशाच्या सीमेवर शत्रूशी दोन हात करताना बलिदान देते ही अतिशय गर्वाची बाब असते.
देशासाठी शहीद होण्यासाठी मोठे भाग्य लागते. यामुळे कुटुंबातील व्यक्ती जेव्हा शहीद होते, तेव्हा त्या कुटुंबियाला अभिमान वाटतो, असे म्हणत फरीदा शेख व अर्चना महाजन यांनी आपल्या पतीच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी स्टूडट कोंसीलच्या विध्यार्थ्यानी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले तसेच माहितीपट दाखविण्यात आला. यावेळी कारगिलच्या युद्धपटाची शौर्य गाथा उलगडत असताना सभागृहात उपस्थितांचे डोळे पाणावल्याचे दिसून आले. कार्यक्रमाच्या अखेरीस राष्ट्रगीत म्हणत ‘भारत माता की जय’ या घोषणांनी सभागृह दणाणून गेला होता. यावेळी प्रा. तुषार पाटील, प्रा. मुकुंद पाटील व प्रा. कल्याणी नेवे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रा. वसीम पटेल यांनी समन्वय साधले तसेच स्टूडट कोंसील व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विध्यार्थ्यानी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.