जळगाव मिरर | २९ मार्च २०२४
शिवजयंतीनिमित्त सुरु असलेल्या मिरवणकीतील वाहनाच्या धक्क्याने प्रार्थनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेरा तुटला. त्यामुळे समाजकंटकांनी मिरवणुकीवर तुफान दगडफेक केल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे घडली. यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाले असून यामध्ये दोन होमगार्डचा समावेश आहे. सुमारे वीस मिनिटानंतर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांनी दहा ते बारा संशयितांना ताब्यात घेतले असून याठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. बो. येथे दरवर्षीप्रमाणे तिथीनुसार शिवजयंती निमित्त मिरवणुक काढली जात असते. यंदा देखील गुरुवारी दि. २८ मार्च रोजी देखील संध्याकाळी शिरसोली प्र. बो. येथील इंदिरा नगर येथून मिरवणूक भव्य मिरवणुक निघाली होती. ही मिरवणुक रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास मिरवणूक वराड गल्ली येथे पोहचली. याठिकाणी मिरवणुकीतील वाहनाचा एका प्रार्थनास्थळाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याला धक्का लागला. यामध्ये तो कॅमेरा तुटल्यामुळे अवघ्या काही मिनिटात समाजकंटकांनी दगडफेक सुरु केली. मिरवणुकीवर होणाऱ्या तुफान दगडफेक् झाल्यामुळे पळापळ झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यामध्ये विशाल दिलीप पाटील (वय २५, रा. शिरसोली), घटनेत मंगेश साहेबराव पाटील (वय ३०), बाळू तुळशीराम पाटील (वय ४५) यांच्यासह पाच ते सहा तरुण व दोन होमगार्ड गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर प्राथमिक रुग्णालयात दाखल करीत उपचार करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस उपअधीक्षक संदीप गावित, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच नागरिकांना शांतता ठेवून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत धरपकड मोहीम राबविण्यात आली. यावेळी दगडफेक करणाऱ्या सुमारे दहा ते पंधरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी गावात तणावपुर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.




















