जळगाव मिरर | २९ मार्च २०२४
राज्यातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारी घटना नेहमीच घडत असतांना एक धक्कादायक घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून समोर आली आहे. प्रेमविवाह करण्यासाठी आपल्या मुलीला मदत केल्याच्या रागातून एका पित्याने दुचाकीवरून जाणाऱ्या मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीपखाली चिरडलं.
या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झालाय. थरकाप उडवणारी ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूज परिसरात गुरुवारी दि.२८ दुपारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. सचिन वाकचौरे असं संशयित आरोपीचं नाव आहे. तर पवन शिवराम लोढे (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पवनचे वडील शिवराम लोढे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आरोपी सचिन याच्या मुलीने काही दिवसांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मुलीच्या प्रेमविवाहाला मावस भाऊ आणि त्याच्या मुलानेच मदत केल्याचा संशय आरोपीच्या मनात होता. या संशयातून त्याने शेंदूर वाडा ते सावखेडा रस्त्यावर दुचाकीवरून निघालेल्या मावस भाऊ आणि त्याच्या मुलाला जीपने उडवलं. धक्कादायक बाब म्हणजे, तरुण खाली पडल्यानंतर आरोपीने त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याची हत्या केली. हत्येनंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
