जळगाव मिरर | ३० मार्च २०२४
राज्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका सावत्र आईने आपल्या १० वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना घडली आहे. गाढ झोपेत असलेल्या मुलाला आईने उचलून नेत हौदात बुडवलं. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत निर्दयी आईला अटक केली आहे. यात शिवमल्हार दयानंद घोडके (वय १० वर्ष) असं मृत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.२८ गुरुवार रोजी शिवमल्हार हा आपल्या वडिलांसोबत घराशेजारील ज्योतिर्लिंग ज्वेलर्स दुकानासमोर झोपला होता. सकाळी उठल्यानंतर तो वडिलांना दिसून आला नाही. त्यामुळे दयानंद घोडके यांनी त्याचा शोध घेतला असता, शिवमल्हार याचा मृतदेह जवळच सुरु असलेल्या बांधकामावरील हौदात आढळून आला. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस अपघाती मृत्यूची नोंद केली होती.
माञ, शिवमल्हार यांची हत्या झाली असावी असा संशय स्थानिक गुन्हे शाखेला आला. त्यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मृत मुलाच्या सावत्र आईला ताब्यात घेतले. तिची कसून चौकशी केली केली. सुरुवातीला महिलेने उडवा उडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवल्या असता, आपणच मुलाची हत्या केल्याची कबुली सावत्र आईने दिली. याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आईवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.





















