जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२४
गेल्या काही दिवसापासून कल्याण लोकसभा मतदार संघात उमेदवारी कुणाला मिळणार यावर अनेक चर्चा सुरु असतांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ही उमेदवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. यावरून आता उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेनेचा रिमोट भारतीय जनता पक्षाच्या हातात असल्याचे स्पष्ट होत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
कल्याण लोकसभा मतदार संघातील विद्यमान खासदार असलेले श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आपुलकी आहे. मात्र, त्यांची उमेदवारी त्यांच्या वडिलांनी म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करायला हवी होती. ती उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. याचा अर्थ शिंदेसेनेचा रिमोट हा भारतीय जनता पक्षाच्या हातात असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष कडून श्रीकांत शिंदे यांना विरोध होत असल्याचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. मात्र, कल्याण लोकसभेत डॉ. श्रीकांत शिंदे हेच शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार असतील असे स्पष्ट करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी महायुती उभी राहणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. इतकंच नाही तर ते गेल्यावेळी पेक्षा यावेळी जास्त मतांनी निवडून येतील, असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि इतर घटक पक्ष मिळून त्यांना निवडून आणणार असल्याचा दावा देखील फडणवीस यांनी केला.
