जळगाव मिरर | १५ एप्रिल २०२४
सध्या लोकसभा उमेदवारांचे अर्ज भरण्याचे काम सुरु झाले असून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे साताऱ्यातील उमेदवार शशिकांत शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला. निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करायला जाताना शशिकांत शिंदे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन केलं. लोकसभा उमेदवारीसाठी अर्ज दाखल करताना शशिकांत शिंदे यांच्यासोबत स्वत: शरद पवार देखील उपस्थित होते. शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं. ‘सुनेत्रांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला, असे शरद पवार म्हणाले.
बारामतीत अजित पवारांनी ‘जिथे पवार आडनाव असेल, तिथे मतदान करायचे. म्हणजे आपली परंपरा खंडित होणार नाही, असं वक्तव्य केलं होतं. अजित पवारांच्या या वक्तव्यावर भाष्य करताना ‘चूक काय, असे विचारत, ‘दोन गोष्टी असतात… एक मूळ पवार आणि बाहेरच्या पवार’ असा उल्लेख केला होता. यावर प्रत्युत्तर देताना सूनेत्रा पवार या कमालीच्या भावुक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.
‘सुनेत्रांबाबत केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला आहे. या देशात महिलांच्या आरक्षणाचा निर्णय घेणारा मी पहिला मुख्यमंत्री होतो. महिलांसाठी अनेक निर्णय घेतले. महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा देण्याचा निर्णय मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे कारण नसताना अद्याप शब्दावरून वेगळं वातावरण निर्माण करण्याचा केला आहे, असे शरद पवार म्हणाले.