
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील आदर्शनगर परिसरात काही माथेफिरू तरुणांनी ३ चारचाकी आणि ६ दुचाकी जाळल्याचा धक्कादायक प्रकार सकाळी उघडकीस आला आहे. शुक्रवारी पहाटे ४ वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. हा माथेफिरू काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून अपार्टमेंटच्या कंपाउंडवरून उडी घेत त्यांनी हे कृत्य केल्याचे दिसत आहे.
सविस्तर वृत्त असे की, शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या आदर्श नगर परिसरात एसएसडी हाईट्समध्ये राजेश सावंतदास पंजाबी हे परिवारासह राहतात. इमारतीचे काही बांधकाम सुरु असून खाली सुरक्षारक्षक देखील परिवारासह राहतो. रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरू तरुण अपार्टमेंटच्या कंपाउंड वॉलवरून उडी घेत आत आले. बाहेरीप एक साडी घेऊन त्यांनी ती ३ दुचाकी आणि एक चारचाकीच्या बोनेटमध्ये अडकवली. पेट्रोल ओतून त्यांनी वाहनांना आग लावली. आगीमध्ये दुचाकी क्रमांक एमएच.१९.४३९९, एमएच.१९.४८९६ आणि एमएच.१९.३७५६ चा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे. तसेच चारचाकी क्रमांक एमएच.१९.सिव्ही.७१०६ चा देखील पुढील भाग व चाक जळाले आहे. माथेफिरू तरुणांनी जवळच असलेल्या सृष्टी अपार्टमेंटमध्ये लावलेली दुचाकी क्रमांक एमएच.१९.के.४२३६ देखील जाळण्याचा प्रयत्न केला. आगीत दुचाकीचे सीट आणि मागील काही भाग जळाला आहे. दुचाकी मालक विलास माधव शिरसाळे हे समतानगरमधील रहिवासी असून सृष्टी अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या योगेश कलंत्री यांच्या वाहनावर ते चालक आहे. रात्री ते दुचाकी कंपाउंडमध्ये लावून घरी गेले होते.
डीमार्टच्या मागील बाजूला असलेल्या आराध्य अपार्टमेंट डॉ.मिलिंद मधुकर जोशी हे राहतात. पहाटे २.३० च्या सुमारास अज्ञात माथेफिरू तरुणांनी त्यांच्या कंपाउंडमध्ये लावलेली चारचाकी क्रमांक एमएच.१९.एपी.१३४५ जाळण्याचा प्रयत्न केला. आगीचा चारचाकीचा मागील भाग जळाला आहे. तसेच समोर ओम नमः शदाराम इमारतीत राहणाऱ्यांची चारचाकी क्रमांक एमएच.१९.सीयू.९४४४ देखील जाळण्याचा प्रयत्न केला.
आराध्य अपार्टमेंटजवळच असलेल्या जय गुरुदेव अपार्टमेंटच्या कंपाउंडमध्ये लावलेल्या दुचाकी क्रमांक एमएच.१९.डीजे.८०४७ सह आणखी एका दुचाकीला माथेफिरुंनी आग लावली. आगीत दोन्ही दुचाकींचा कोळसा झाला असून केवळ सांगाडा शिल्लक आहे. रात्री जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाच्या बंबानी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धाव घेतली होती. याबाबत दुपारी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.






















