जळगाव मिरर | २ ऑक्टोंबर २०२६
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील पाच तरुणांकडून नेहमी होणाऱ्या छेडखानीला कंटाळून आडगाव येथील १८ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केली होती. या संदर्भात कासोदा येथील ५ तरुणांना अटक करून जळगाव येथील विशेष कोर्टात हजर केले असता त्यांना पाच ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आडगाव येथील तरुणीने आत्महत्या केल्याची घटना २६ सप्टेंबरला घडली होती. याबाबत संशयित आरोपीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महेश विठ्ठल मराठे (वय २१), अभिषेक सुनील उशिरे (वय २३), रोहित महेंद्र मोरे (वय २१), मनोज रामभाऊ गढरी (वय २१) आणि रुपेश आनंदा वारे (वय २१) यांच्यावर कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्व तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, ही तरुणी एरंडोल येथील महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. तर, २६ रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास तिने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या तरुणीचे आई-वडील शेतातून घरी परत आल्यावर हा प्रकार लक्षात आला.
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून पीडित तरुणीला हे संशयित त्रास देत होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनात स.पो.नि. श्रीकांत पाटील व पोलीस कर्मचारी करत आहेत.



















