जळगाव मिरर | ४ मे २०२४
देशामध्ये भाजपचे सरकार दहा वर्षे कार्यरत आहे, परंतु सर्व नवीन येणारे उद्योग व कारखाने हे गुजरातला नेले. त्यामुळे महाराष्ट्रातील युवकांना नोकऱ्या मिळू शकलेल्या नाहीत. दहा वर्षांच्या कालावधीत २०१४ साली असणारे स्वयंपाक गॅस, डिझेल व पेट्रोल भाव आज तिपटीने वाढवले. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन जगणे मुश्किल झाले आहे. शेतकरी वर्गाला शेतात पिकवलेल्या मालास हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे भाजपने असे कोणते काम केले की ते ४०० च्या पार जातील?, ते दोनशेच्या आतच राहील, असा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी मुरुड येथील सभेत केला.
यावेळी व्यासपीठावर आ. संजय पोतनीस, खासदारकीचे उमेदवार अनंत गीते, आ. भाई जगताप, माजी आमदार पंडित पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील आदी उपस्थित होते.
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, या सरकारला ४०० खासदार का पाहिजे, तर यांना संविधान बदल घडवून आणायचा आहे. आरक्षण संपुष्टात आणायचे आहे. तेव्हा नागरिकांनी सजगपणे मतदान करून आपल्या देशाचे संविधान वाचविण्यासाठी मतदान करावे, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी याप्रसंगी केले.