जळगाव मिरर | २० जून २०२४
गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यात खुनाच्या घटना सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथून थरारक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने दिराच्या मदतीने ब्लेडच्या सहाय्याने पोटावर वार करून तसेच दगड डोक्यात टाकून निर्घृण खून केला. इतकेच नव्हे तर अपघात वाटावा म्हणून त्याचा मृतदेह कोदगाव शिवारात महामार्गावर टाकून दिला. खून केलेल्या व्यक्तीचे नाव बाळू सिताराम पवार (रा. गवळीवाडा, न्यायडोंगरी ता. नांदगाव) असे असून चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे बुधवारी सदर घटना उघडकीस आली. याप्रकरणी महिला व तिच्या चुलत दिराला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळू सीताराम पवार हा पत्नी वंदना पवार (वय ३०) हिच्यासह नाशिक जिल्ह्यातील न्यायडोंगरी येथे राहत होता. तिचे व चुलत दीर गजानन राजेंद्र पवार (वय ३२, रा. न्यायडोंगरी, ता. नांदगाव, जि. नाशिक) याच्याशी मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. वंदना व बाळू हे मंगळवार १८ रोजी न्यायडोंगरी येथून चाळीसगाव येथे आले. बाळू यास गजानन याने दारू पाजली. सायंकाळी गजानन यास दुचाकीने कोदगाव ता. चाळीसगाव शिवारात नेले. तिथे वंदनाने बाळूच्या पोटावर ब्लेडने वार केले आणि दोन वेळा डोक्यात मोठा दगड टाकून त्यास ठार मारले आणि मृतदेह महामार्गावर टाकून दिला. बाळूच्या खिशात आधारकार्ड ठेवले. यानंतर दोघे तेथून पसार झाले. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ५२ वर कोदगाव शिवारात १८ रोजी रात्री ११ वाजेच्या पूर्वी बाळू सिताराम पवार याचा मृतदेह आणि रक्ताने माखलेला दगड मिळून पोलिसांना आढळून आला. बाळू पवार याच्या शरीरावर ब्लेड व दगडाने मारल्याचा खुणा आढळून आल्या.
याप्रकरणी शहर पोलिसांनी मयत इसमाच्या पत्नीला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. मोबाइल लोकेशनवरून महिलेला पकडले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहाची झाडाझडती घेतली असता पोलिसांना मृत इसमाच्या पत्नीचा मोबाइल नंबर मिळाला. त्या आधारे पोलिसांनी मृताच्या पत्नीला फोन करून तू कुठे आहे असे विचारले, त्यानंतर त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, मी सध्या शिर्डीला आहे आणि माझा पती नायडोंगरीला गेला आहे. परंतु पोलिसांना महिलेच्या बोलण्यावर संशय आला. पोलिसांनी महिलेचा फोन ट्रेस केला असता महिलेचे लोकेशन चाळीसगाव रेल्वे पोलिस स्टेशन दाखवत असल्याचे आढळून आले. व्यसनाधीन पतीच्या त्रासाला कंटाळून व चुलत दिराशी असलेल्या प्रेम संबंधातून खून केल्याची कबुली संशयित आरोपी वंदना पवार हिने दिली आहे.