जळगाव मिरर | २४ जून २०२४
राज्यातील पुणे शहरात दिवसेदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना नेहमीच हे शहर चर्चेत येत आहे. नुकतेच हडपसर भागातील वैदुवाडी परिसरात मध्यरात्री झाेपेतून जागे केल्याने चिडलेल्या बहिणीचा भावाने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. बहिणीचा खून केल्यानंतर भावाने बहिणीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला होता. पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात आरोपीचा बनाव उघडकीस आला. साफिया सुलेमान अन्सारी (१६, रा. वैदुवाडी,) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ शारीख सुलेमान अन्सारी (१८ रा. वैदुवाडी ) याला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साफिया आणि शारीख वैदूवाडीतील रिद्धी -सिद्धी सोसायटीत राहायला आहेत. १७ जून रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास शारीख घरी आला. त्यावेळी साफिया झोपली होती. शारीखला झोपण्यासाठी चादर पाहिजे होती. त्यामुळे त्याने बेडरूमचा दरवाजा वाजवला. राग आल्यामुळे साफिया आणि शारीख यांच्यात वाद झाला. यामुळे साफियाने रागातून घरातून निघून जाण्याचा प्रयत्न केला. शारीखने तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने रागाच्या भरात चाकूने शारीखवर वार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यात भांडणे झाली. त्यानंतर शारीखने तिचा गळा दाबून साफियाचा खून केला.
साफिया नेहमी आजारी असायची. तिच्यावर उपचारही करण्यात येत होते. आजारपणामुळे ती नैराश्यात होती. ती स्वभाव चिडचिडा झाला होता. किरकोळ वादातून ती आक्रमक व्हायची. १७ जून रोजी किरकोळ वादातून साफिया भाऊ शारीख याच्या अंगावर धावून गेली. त्या वेळी त्यांच्यात झटापट झाली. रागाच्या भरात शारीखने तिचा गळा दाबला. तिचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर शारिख घाबरला. त्याने साफियाला गळफास दिला. तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चौकशी केली. घटनास्थळाची पाहणी केली. संशय बळावल्याने पोलिसांनी शारिखची चौकशी केली. तेव्हा त्याने बहिणीचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक मंगल मोढवे तपास करत आहेत.