जळगाव मिरर | १० ऑगस्ट २०२४
आजच्या मोबाईलच्या युगात लहान मुले आपल्या संस्कृती व परंपरांपासून लांब जात आहेत. त्यांना पुन्हा आपल्या महाराष्ट्राची अस्सल संस्कृती व परंपरा यांची माहिती व्हावी म्हणून बालरंगभूमी परिषदेतर्फे जल्लोष लोककलांचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत पहिल्या टप्प्यात लोककला प्रशिक्षण कार्यशाळांचे राज्यभरात आयोजन करण्यात आले आहे. शहरातील भैय्यासाहेब गंधे सभागृहात बालरंगभूमीच्या जळगाव जिल्हा शाखेकडून लोककला प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी ला.ना.सार्वजनिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा ढेपे, बालरंगभूमी परिषद जळगावचे अध्यक्ष योगेश शुक्ल, प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांच्या हस्ते नटराज पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्रातील व विशेषतः खान्देशातील लोककला प्रकारांविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर लोककला सादरीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या लोकवाद्यांची माहिती विद्यार्थ्यांना करुन देण्यात आली. प्रात्याक्षिकांसह सादरीकरण करतांना कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्रगीताने करण्यात आली. शाहिरी पोवाडा या लोककला प्रकारात शाहिर विनोद ढगे व शाहिर सचिन महाजन यांनी पोवाडा सादर केला. त्यानंतर अमोल ठाकूर, दिपक महाजन, मोहित पाटील, देवराज बोरसे, आकाश बाविस्कर यांनी श्री गणेशाची आराधना करणारा गण सादर केला. खान्देशी मातीतील अस्सल लोककला वहीगायन.
मौखिक परंपरेने एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाणारी ही लोककला आता लोप पावत चालली आहे. वहीगायन लोककलेचे सादरीकरण शाहिर संतोष चौधरी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. वहीगायनाच्या लयबध्द तालावर विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवत ताल धरत प्रतिसाद दिला. त्यानंतर भुसावळ येथील लोककला अभ्यासक धनश्री जोशी व दर्शन गुजराथी यांनी भारुड या लोककला प्रकाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. भारुडाचे सादरीकरण करता सद्यस्थितीतील दाखले देत विद्यार्थी – विद्यार्थिंनींना मुलींचे संरक्षण, जीवनातील अभ्यासाचे महत्व, संस्कारांचे महत्व पटवून दिले. खान्देशी पोतराज हा लोककला प्रकार तुषार थोरात यांनी सादर केला व त्यानंतर अवधूत दलाल, प्रभाकर सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गोंधळ या लोककला प्रकाराचे सादरीकरण केले. या सादरीकरणाला विद्यार्थ्यांनी जल्लोषात प्रतिसाद दिला.राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख कार्यवाह विनोद ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन अध्यक्ष योगेश शुक्ल यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी बालरंगभूमी परिषद जळगाव जिल्हा शाखेच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले