जळगाव मिरर | ८ सप्टेंबर २०२४
श्री संत गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी शेगाव येथे समाधी घेतली होती. त्यामुळे ऋषी पंचमीचा दिवस श्री. संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा करण्यात येतो मुक्ताईनगर येथिल श्री.संत गजानन महाराज मंदिर येथे सुद्धा दरवर्षी विविध धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रमांनी संत गजानन महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येते
यावर्षी सुद्धा मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रींचा पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला आंब्याची तोरणे, केळीची पाने आणि रंगीबेरंगी फुलांनी मंदिर परिसराची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
गण गण गणात बोते या मंत्राच्या गजरात गजाननांच्या नामघोषात भक्तिमय प्रसन्न वातावरणात राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे आणि डॉ प्रांजल खेवलकर यांच्या हस्ते संत गजानन महाराज यांचा अभिषेक आणि विधिवत पुजन करण्यात आले यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या श्री.संत गजानन महाराजांनी जीवात्म्याला आत्मज्ञान प्राप्त करुन देण्यासाठी कर्ममार्ग, भक्तिमार्ग आणि योगमार्ग हे तीन मार्ग असल्याची शिकवण दिली आहे योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले.
महाराजांनी उष्ट्या पत्रावळीतील भाताची शिते वेचून खाल्ली. त्यांच्या ह्या कृतीतून अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा कधीही अपमान करु नये, नासाडी करू नये याची आपल्याला शिकवण दिली आहे.
गजानन महाराजांनी “गण गण गणात बोते” हा मंत्र दिला आहे या मंत्राचा अर्थ लक्षात घेतला तर पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात, बोते म्हणजे बघा! प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही, तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. कोणाशी वाईट वागू नका आणि स्वतःही वाईट कृत्य करू नका असा गजानन महाराज यांनी गण गण गणात बोते या मंत्रातून संदेश दिला असल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. रोहिणी खडसे यांच्या हस्ते उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले यावेळी डॉ प्रांजल खेवलकर, मंदाताई खडसे, माजी सरपंच पुष्पा ताई खेवलकर आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते