जळगाव मिरर | ११ सप्टेंबर २०२४
काकाच्या उत्तरकार्यासाठी गेलेल्या शिक्षकाच्या घरात चोरट्यांनी डल्ला मारीत तेथून रोख रकमेसह सोने चांदीचे दागिने असा एकूण ३ लाख १७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना दि. ९ रोजीसकाळच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भोईटे नगरातील गौरी प्राईड अपार्टमेंटमध्ये मयूर बाळासाहेब देशमुख हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते संत कंवरराम हिंदी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरीस आहे. त्यांच्या काकाचे उत्तरकार्य असल्याने देशमुख हे कुटुंबियांसह चोपडा तालुक्यातील अडावद येथे गेले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून त्यांचे घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या गेटचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातून चोरट्यांनी ७० हजार रुपयांच्या रोकडसह ३ लाख १७ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला. देशमुख यांचे शेजारी राहणाऱ्यांनी दि. ९ रोजी त्यांना फोन करुन तुमच्या घरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्यानुसार लागलीच मयूर देशमुख हे कुटुंबियांसह घराकडे येण्यासाठी निघाले. दोन तासानंतर देशमुख हे कुटुंबियांसह घरी आल्यानंतर त्यांना घराच्या कडीकोयंडा तुटलेले होते, तर आतमधील दरवाजा उघडा असल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्या घराजवळ परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. मयूर देशमुख यांनी घरात जावून बघितले असता, त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसून आला.