जळगाव मिरर | १२ सप्टेंबर २०२४
अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा येथील १९ वर्षीय तरुणाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या वस्तीगृहामध्ये जीवन संपवले. प्रतीक विजयराव गोरडे असे त्याचे नाव असुन, तो मुळचा अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा गावचा रहीवासी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे रसायन तंत्रज्ञान विभागात बी. टेक.च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेला प्रतीक गोरडे (१९ वर्षे) होता. तो अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा गावातील असुन त्याने विद्यापीठाच्या वस्तीगृहामध्ये प्रवेशही घेतला होता. दोनच दिवसांपूर्वी आई-वडिलांनी त्याला वस्तीगृहात सोडून गेले होते. मुलांचे वसतिगृह क्रमांक तीन येथे खोली क्रमांक टी ४४७ मध्ये राहात होता.
प्रतीकसह खोलीमध्ये पाच सहकारी राहत होती. बुधवारी (दि.११) वस्तीगृहाच्या गणेश मंडळामध्ये आरती झाली. त्यानंतर जेवण झाले. विद्यार्थी वस्तीगृहाच्या खोलीकडे परतले. मात्र प्रतीकच्या खोलीच्या दरवाजा आतून बंद होता. काही जणांनी खिडकीच्या काचा फोडून आत बघितले असताप्रतीकने गळफास घेऊन जीवन संपवले होते. विद्यार्थ्यांनी त्याला विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पाळधी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी गेले व परिस्थिती जाणून घेतली. घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिस दूरक्षेत्राचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूची नोंदचे काम सुरू होते.
