
जळगाव मिरर | २२ सप्टेंबर २०२४
चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ट्रेलरमधील पाईप निसटून चालकाच्या कॅबिनवर धडकले. यामध्ये कॅबिनचा पुर्णपणे चुराडा झाला. दरम्यान, प्रसंगावधान राखत चालकाने उडी घेतल्याने तो बालंबाल बचावला. ही घटना शनिवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास महामार्गावर दूरदर्शन टॉवर ते मन्यारखेडा फाट्यादरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातकडून ओडीसाकडे लोखंडी पाईप घेऊन एक ट्रेलर जात होता. शनिवारी पहाटे जळगावच्या पुढे काही अंतरावर गेल्यानंतर दूरदर्शन टॉवर ते मन्यारखेडा फाट्यादरम्यान चालकाने अचानक इमर्जन्सी ब्रेक दाबला. यामुळे एकावर रचलेले पाईप निसटून ते पुढे चालकाच्या कॅबिनवर धडकले. कॅबिनचा पूर्ण चुराडा होऊन ही कॅबिन ट्रेलरच्या खाली दाबल्या गेली. चालकाने वेळीच कॅबिनमधून उदी घेतल्यामळे तो बालंबाल बचावला. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक आसाराम मनोरे, त्यांचे सहकारी तसेच महामार्ग पोलिस, वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहचले.
रस्त्याच्या मधोमध ही घटना घडल्याने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. क्रेनच्या सहाय्याने पाईप बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. या दरम्यान दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळपासून वाहतुक विस्कळीत झाल्यामुळे पोलिसांनी अनेक वाहने गोदावरी महाविद्यालयाच्या मागून मन्यारखेडा फाट्याकडून वळवली होती. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास वाहतूक सरळीत झाली





















