जळगाव मिरर | 5 नोव्हेंबर 2026
राज्यात सर्वसामान्य नागरिक विविध आर्थिक संकटांचा सामना करत असताना दुसरीकडे शासकीय अधिकाऱ्यांच्या लाच प्रकरणांमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडत आहे. जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागातील उपविभागीय अधिकारी सतीश शिसोदे यांच्या प्रकरणाने तर या चर्चेला अधिकच उधाण आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत त्यांच्या घरातून आणि बँक लॉकरमधून तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८९ रुपयांची मालमत्ता आढळून आली आहे. मात्र, या मालमत्तेव्यतिरिक्त आणखी काही आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचे धागेदोरे तपासात समोर येतात का, याकडे आता लक्ष लागले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिसोदे यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या दोन परिचित व्यक्तींकडे काही रोकड आणि दागिने सुरक्षित ठेवल्याची चर्चा सुरू आहे. शहरातील एका गेस्ट हाऊसशी संबंधित व्यक्ती तसेच जिल्हा परिषदेतील एका कर्मचाऱ्याच्या संदर्भातही चर्चा होत असल्याचे समजते. मात्र, या माहितीची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. संबंधित व्यक्तींकडे कोणतीही मालमत्ता असल्याचे किंवा त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.
या प्रकरणात शिसोदे यांचे आर्थिक व्यवहार, मालमत्तेचे स्रोत, संबंधित व्यक्तींशी झालेले आर्थिक व्यवहार आणि उपलब्ध डिजिटल पुरावे यांची सखोल तपासणी होणे महत्त्वाचे आहे. तपास यंत्रणेने कायदेशीर प्रक्रियेनुसार कॉल डिटेल रेकॉर्ड आणि इतर उपलब्ध पुराव्यांची पडताळणी केल्यास तपासाला काही महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात. दरम्यान, शिसोदे यांच्या नावावर तसेच त्यांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित इतर मालमत्तेचा काही तपशील समोर येतो का, याबाबतही उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, कथित रोकड आणि दागिन्यांच्या चर्चेची सत्यता तपास यंत्रणेच्या अधिकृत तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. आता एसीबीच्या पुढील तपासात आणखी कोणते आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेचे धागेदोरे समोर येतात, याकडे जळगावकरांचे लक्ष लागले आहे.





















