जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२४
शहरातील निर्भया फाउंडेशन आणि आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने व शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या संकल्पनेतून मोफत १० दिवसीय स्वसंरक्षण व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. दहा दिवसात ५०० पेक्षा अधिक तरुणींनी, मुलींनी प्रशिक्षण घेऊन उत्साह दाखविला.
“सुरक्षित माझी बहीण” या उद्देशाखाली आ. राजूमामा भोळे यांनी निर्भया फाउंडेशन आणि आत्मनिर्भर महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या अनमोल सहकार्याने महिला व युवतींसाठी हे दहा दिवसीय स्वसंरक्षण व लाठीकाठी प्रशिक्षण शिबिर शहरातील विविध भागात घेतले. यात जुना असोदा रोड, अयोध्या नगर, शिव कॉलनी परिसर, एमआयडीसी परिसरातील सरस्वती विद्यालय, शा.ल.खडके विद्यालय, नंदिनीबाई मुलींचे विद्यालय या ठिकाणी हे शिबिर तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे समन्वयन ललित चौधरी, बी. आनंदकुमार यांनी केले.
समाजात वावरत असताना विद्यालयात शिकत असताना मुलींना अनेक अपप्रवृत्तींना सामोरे जाण्याची दाट शक्यता असते. अशा विपरीत प्रसंगी मुली व महिलांनी घाबरून न जाता संयमाने व धीराने कसे तोंड द्यावे याबाबत माहिती असावी व त्या दृष्टीने प्रशिक्षित देखील असावे हा उद्देश घेऊन आम्ही हे प्रशिक्षण शिबिर राबविले असल्याचे आ. राजूमामा भोळे यांनी सांगितले. दरम्यान काळाची गरज लक्षात घेता आगामी काळात आणखी शिबिर घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.