जळगाव मिरर | ११ ऑक्टोबर २०२४
गेल्या काही दिवसापासून राज्यातील सर्वच पक्षातील नेते आपले राजकीय गणित बघून पक्षांतर करीत असतांना नुकतेच निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा झटका बसला असून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर इतरही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची मोठी जबाबदारी होती. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवून प्रदेश संघटन सचिवपदाची नवी जबाबदारी देण्यात आली. त्यांना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याने प्रदीप राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्रदीप राऊत यांनी या संदर्भात आरोप केला की, “पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, विधानसभेचे माजी उपसभापती शरद तासरे आणि प्रकाश बोंडे यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना काढून टाकण्यात आले. कोणतेही कारण न देता किंवा चर्चा न करता. हा निर्णय घेण्यात आला. हा आमच्या पक्षाच्या सचोटीचा आणि कार्याचा अपमान असल्याने मी प्रदेश संघटन सचिव पदाचा राजीनामा देत असल्याचे प्रदीप राऊत यांनी सांगितले. प्रदीप राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किशोर बर्डे, सामाजिक न्याय विभागाचे सुनील कीर्तनकर यांनी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.
अमरावतीत नाराजी समोर आलेली असताना दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले होते. त्यानंतर अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, कागलचे नेते समरजित घाटगे यांनी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. काही नेते अजूनही पक्षप्रवेशाच्या वाटेवर आहेत. अजित पवार यांच्या पक्षाचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर हे 14 ऑक्टोबरला शरद पवार यांच्याकडे परतण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे हेही राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. त्यांनी शरद पवार यांची दोनदा भेट घेतल्याचेही सांगितले जात आहे.