जळगाव मिरर | १७ ऑक्टोबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर नुकतेच शिंदे सेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
शंभरपेक्षा जास्त आमदार असताना भाजपने मुख्यंमत्रिपदाचा त्याग केला आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकनाथ शिंदेंना उद्देशून केले होते. त्याला आता ‘काय झाडी, काय डोंगार’ फेम सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही धाडस केले नसते तर तुमच्या त्यागाला काय महत्व होते, अशा शब्दांत शहाजी बापू पाटील यांनी भाजपला सुनावले आहे. आम्ही आमची आमदारकी पणाला लावली, असेही ते म्हणाले.
भारतीय जनता पक्षाने त्याग केला हा मुद्दा खरा आहे. पण आम्ही धाडक केले नसते तर तुमच्या त्यागाला काय महत्व असते? असा सवालही शहाजी बापू पाटील यांनी केला आहे. आम्ही आमच्या आमदारकी पणाला लावून गुवाहटीला गेलो होतो. हे धाडस आम्ही केले नसते तर भाजप सत्तेत आली नसती. देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही गुवाहटीला गेलो होतो, असे पलटवार शहाजी बापू पाटील यांनी केला.
संजय राऊत यांनी न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढल्यावरुन टीका केली होती. यावरही आमदार पाटील यांनी भाष्य केले आहे. न्याय हा उघड्या डोळ्यांनी करायचा असतो. न्यायदेवतेच्या हातात आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान दिले आहे, असे उत्तर पाटील यांनी राऊत यांच्या टीकेला दिले आहे. शहाजी बापू पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील आणि उदय सामंत यांच्या मनोज जरांगे भेटीवर देखील भाष्य केले आहे. जरांगे पाटील यांना पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या भेटींमध्ये सकारात्मक चर्चा झाली असेल, असा विश्वास शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केला.