जळगाव मिरर | २५ ऑक्टोबर २०२४
महाविकास आघाडीत जागांवरून प्रचंड रस्सीखेच सुरू असतांना काल काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहिर केली. यात खान्देशातील ७ उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील एक, धुळ्यातील दोन तर नंदुरबार जिल्ह्यातून चार अशा एकुण सात उमेदवारांचा पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.
धुळे जिल्ह्यात धुळे ग्रामीणसाठी आ. कुणाल रोहीदास पाटील यांना संधी देण्यात आली आहे. कुणाल पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. साक्री मतदार संघातून माजी खा. बापू चौरे यांचे सुपूत्र प्रविण चौरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा-धडगाव मतदार संघातून अॅड. के. सी. पाडवी यांना आठव्यांदा उमेदवारी मिळाली आहे. नवापूरमधून माजीमंत्री सुरूपसिंग नाईक यांचे सुपूत्र आ. शिरीष नाईक यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. शहादा – तळोदा मतदार संघातून मंत्री विजयकुमार गावित यांचे बंधू असलेले राजेंद्रकुमार गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नंदुरबार मतदार संघातून किरण तडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात रावेरमधून धनंजय शिरीष चौधरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.