जळगाव मिरर | २८ नोव्हेबर २०२४
जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक शासकीय विभागात होत असलेल्या लाचखोरीला आळा बसविण्यासाठी प्रयत्न सुरु असून देखील लाचखोरीचे प्रमाण वाढत आहे. नुकतेच अपघात प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून पंधरा हजाराची लाच घेतांना पारोळा पोलीस ठाण्यातील हिरालाल देविदास पाटील (वय ४३, गळवाडे रोड, अमळनेर) व प्रवीण विश्वास पाटील (वय ४५, रा. पोलीस लाईन पारोळा) या दोघांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दुचाकीने जात असतांना समोरुन येणाऱ्याटुचाकीसोबत अपघात झाला होता. यामध्ये दुचाकीस्वार मयत झाल्याची घटना दि. ७ रोजी पारोळा ते धरणगाव रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदाराला या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी त्यांच्याकडे पोलिसांनी २० हजारांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती ती रक्कम १५ हजारांवर ठरली. याबाबतची तक्रार धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती. त्यांच्या पथकाने सापळा रचला असता, पोलिसाने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली. त्यानुसार एकाने दुसऱ्या पोलीसाला लाचेची रक्कम घेवून येण्यास सांगितले. दरम्यान, तो कर्मचारी पैसे घेण्यासाठी आले असता, त्याला सापळा रचून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई होताच रक्कम घेवून येण्यास सांगणारा संशयित फरार झाला. याप्रकरणी दोघांविरुद्ध पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई धुळे येथील लाच लुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोहेकॉ राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, रामदास बारेला, प्रवीण पाटील यांच्या पथकाने केली.