जळगाव मिरर | ३ डिसेंबर २०२४
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे, अशा महिलांना महिना 1500 रुपये देण्यास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, महायुतीने विधानसभा निवडणुकीत 1500 रुपयांची ही रक्कम 2100 रुपये करणार, असे आश्वासन दिले होते. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले असून यामध्ये लाडकी बहीण योजनेचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, नवे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडक्या बहिणांना 2100 रुपये कधी पासून मिळणार याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार एका मुलाखतीत भाष्य केले आहे. लाडक्या बहिणींना पुढील वर्षापासून 2100 रुपये देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देणार हे आश्वासन देण्यात आले होते. ते आश्वासन आम्ही पूर्ण करु. हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल. निवडणुका झाल्या की, आम्ही आश्वासन पूर्ण करत नाहीत, अशी आमची प्रतिमा होईल. मी याबाबत मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे. आपण शब्दावर ठाम राहायला हवे. मी महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करणार आहोत.
ती आश्वासन धुळीस मिळू देणार नाहीत. आमच्या महायुतीमध्ये सरकारमध्ये लाडक्या बहिणांना 2100 रुपये देण्याची क्षमता आहे. महायुतीतील एकही पक्ष आमच्या 2100 रुपये देण्याच्या योजनेला विरोध करणार नाही. जानेवारी की जुलै किंवा कोणत्या महिन्यापासून 1500 रुपयांमध्ये वाढ करुन 2100 रुपये देण्यास सुरुवात करायची याबाबत चर्चा करण्यात येईल. आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरु केली होती. त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
आमचे सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरुन 2100 करु, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले होते. दरम्यान, आता ही वाढीव रक्कम देण्यास सुरु करण्यासाठी भाऊबीज उजाडावी लागेल, याबाबतचे संकेत भाजपचे आमदार आणि ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत.