जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२४
पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक परिसरात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. दरम्यान, बाळद येथील शेतकरी वाल्मीक भास्करराव सोमवंशी यांच्या बंद घरात घुसून चोरांनी धुमाकूळ घालून चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील शेतकरी वाल्मीक सोमवंशी यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने ३ ते ६ डिसेंबरदरम्यान ११ तोळे सोने, चांदीच्या वस्तूंसह ब्रिटिश कालीन नाणी व रोकड रक्कम असा जवळपास चार लाखांचा ऐवज लंपास केला केल्याची माहिती पाचोरा पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत. दरम्यान, ही घटना घडली तेव्हा सोमवंशी कुटुंबीय लग्नानिमित्त बाहेरगावी गेलेले होते. या घटनेमुळे परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. पाचोरा पोलीसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा मुस्क्या आवळण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. तर बऱ्याच दिवसांपासून बाळद गावातही पोलीस चौकीची मागणी ही यानिमित्त पुन्हा केली जात आहे. तर बाळद हे गाव नगरदेवळा आऊट पोस्टच्या अधिपत्याखाली येते.
मात्र, नगरदेवळा औट पोस्टच्या अधिपत्याखाली गावांची संख्या जास्त असल्याने तेथील पोलीस यंत्रणा अपूर्ण पडत आहे. त्यामुळे शासनाने त्वरित लक्ष घालून बाळद परिसरात एक पोलीस चौकीचे निर्माण करणे गरजेचे आहे. त्यामुळे चोरांवर काही प्रमाणात अंकुश निर्माण होऊ शकतो, असे जाणकारांचे म्हणने आहे. तर नगरदेवळा आऊट पोस्टला गावांच्या मानाने कर्मचारी संख्या अतिशय कमी आहे. तेथे ही कर्मचारी संख्या वाढवण्याची गरज आहे. बाळद गावात या एका वर्षाच्या आत जवळपास सात ते आठ वेळा चोरीच्या घटना घडलेल्या आहेत. घरांमधील चोऱ्यांबरोबरच गावातील गुरे, शेळ्यांच्या चोऱ्यांचे ही प्रमाण वाढलेले आहे. तसेच विहिरीवरील वीज पंप ही चोरीला गेलेल्या आहेत. परंतु, आजपर्यंत कुठल्याही चोरीच्या गुन्ह्याचा तपास लागलेला नाही.