ठाणे : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात आता राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. कळवा तसेच ठाणे परिसरात शिंदे समर्थकांनी ‘आम्ही साहेबांसोबत’ असे बॅनर लावण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या बॅनर्सवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे फोटो गायब आहेत. बॅनरवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटोंना स्थान देण्यात आले आहे.
पालकमंत्री गुलाबराव पाटीलसह १ आमदार शिंदेकडे गुवाहाटीला रवाना
ठाणे शहरातील महापालिकेतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक माजी नगरसेवक शिंदे यांच्या सोबत राहतील असे दावे त्यांचे समर्थक आतापासूनच करताना दिसत आहेत. शिंदे यांचे काही निकटवर्तीय गुवाहाटी येथे त्यांच्या समवेत असल्याची माहिती सूत्रांद्वारे मिळत आहे. त्यात काही माजी नगरसेवकांचा समावेश आहे. दरम्यान मंगळवारी शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात शुकशुकाट पाहायला मिळाला होता.
टेंभी नाका येथील आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात एरवी शिवसैनिकांची गर्दी असते. मात्र काल या ठिकाणी फारशी गर्दी झाल्याचे दिसून आले नव्हते. आज मात्र ठाणे, कळवा भागात शिंदे यांच्या समर्थनार्थ बॅनर लागल्याने ही शिवसेना आणि ‘शिंदे सेना’ अशी थेट लढाई आता सुरू झाल्याचे संकेत मिळू लागले आहेत. नवी मुंबईत जिल्हा शखेमार्फत निदर्शनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. या निदर्शनास शिवसेनेचे कोणते नेते उपस्थिती राहतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















