जळगाव मिरर | १८ डिसेंबर २०२४
गेल्या काही दिवसापासून जळगाव शहरातील अनेक भागात चोरीच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच घराबाहेर दुचाकी उभी करून पार्सल देण्यासाठी गेलेल्या ‘कुरियर बॉय’च्या बॅगमधून एका जणाने दोन पार्सल चोरून नेले. ही घटना मंगळवार दि. १७ डिसेंबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास गणपती नगरात घडली. बॅगमधून चोरी करताना चोरटा सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरात प्रशांत युवराज पवार (वय ३७) हे कुरिअर वाटपाचे काम करतात मंगळवार दि. १७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता दिवसातील पहिलेच पार्सल देण्यासाठी ते शहरातील गणपती नगरात गेले. त्यांनी दुचाकी घराच्या बाहेर उभी करून ते पार्सल देण्यासाठी संबंधितांकडे गेले. त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका जणाने दुचाकीवर ठेवलेल्या बॅगेतून टी-शर्ट आणि जॅकेट असलेले अंदाजे १० हजार रुपये किमतीचे दोन पार्सल चोरून नेले. दुचाकीजवळ आल्यानंतर हा प्रकार पवार यांच्या लक्षात आला.
बॅगमधून दोन महागडे पार्सल चोरी झाल्याचे लक्षात येताच, प्रशांत पवार यांनी रामानंद नगर पोलीसात धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. यामध्ये चोरटा पार्सल चोरुन नेतांना कैद झाला असून पोलिसांनी ते फुटेज जप्त केल आहे. याप्रकरणी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
