जळगाव मिरर | ११ जानेवारी २०२५
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रंचड व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये एका डान्सबार मधील काही महिला तळघरातून बाहेर पडताना दिसून येत आहे. महिला तळघळण्यातून बाहेर येतानाच्या या व्हिडिओवरील मजकुरात आदित्य ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. या माध्यमातून आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात असून याविषयी ठाकरे गटाने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बारबाला बाहेर पडतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला गेला आहे. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल झाला असून याचा संबंध आदित्य ठाकरे यांच्याशी जोडण्यात आला आहे. मात्र या आरोपांमध्ये काहीही तथ्य नसून या विरोधात उद्धव ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. यामध्ये काही राजकीय आणि सत्ताधारी पक्षाकडूनच हा व्हिडिओ व्हायरल केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे या व्हिडिओची चौकशी करावी आणि योग्य ती करावी करावी, अशी मागणी देखील विनायक राऊत यांनी सायबर पोलिसांकडे केली आहे.
या व्हिडिओमध्ये दिसत असलेला बार हा आदित्य ठाकरे यांच्या मालकीचा असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे. या माध्यमातून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाने केला आहे. यामध्ये विकृत मनोवृत्तीचे लोक आणि सत्ताधारी राजकारणी आहेत, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. या संदर्भात आम्ही सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे तसेच पोलिसांनी देखील सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षच आदित्य ठाकरे यांची बदनामी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडून अद्याप कोणत्याही प्रकारची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, पदाधिकाऱ्यांच्या वतीने सायबर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केल्यामुळे या प्रकरणात काय कारवाई होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.