जळगाव मिरर | १२ जानेवारी २०२५
अटकेपासून वाचण्यासाठी पैशाची मागणी करीत जळगावातील डॉक्टरला ३१ लाख ५६ लाख रुपयांत तर दुसऱ्या घटनेत एमबीए झालेल्या उच्चशिक्षीत तरुणाला नफ्याचे अमिश दाखवीत त्याला ५ लाख ३२ हजार रुपयांमध्ये सायबर ठगांनी गंडविले. याप्रकरणी दोन्ही गुन्ह्यांमध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियासह कॉलर ट्युनद्वारे जनजागृती केली जात असतांना देखील उच्चशिक्षीत सायबर ठगांच्या अमिषासह धमकीला बळी पडले आहेत.
शेअर ट्रेडिंग, क्रिप्टो करंसी, पॉलिसी, सेक्सटॉर्शन, कुरिअर, फ्रेन्चाईसी, फिशिंग कॉल, डिजिटल अरेस्ट असे वेगवेगळे कारणे पुढे करीत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. याविषयी विविध माध्यमांद्वारे शासनाकडून जनजागृती केली जात आहे. त्यात गेल्या महिन्यापासून तर कॉल केल्यानंतर प्रत्येक कॉलला सुरुवातीला डिजिटल अॅरेस्टविषयी जनजागृती करणारी कॉलर ट्यून कानी पडत आहे. असे असतानाही मनीलॉन्ड्रींगप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे सांगत अटकेपासून वाचण्यासाठी दिलेल्या धमकीला जळगावातील डॉक्टर बळी पडल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये शहरातील निवृत्ती नगरातील डॉ. दिगंबर दिनकरराव उगले (वय ५८) यांच्याशी दि. ३१ डिसेंबर ते दि.९ जानेवारी दरम्यान राधिका नावाची महिला तसेच राजेश प्रधान व मुकेश बॅनर्जी या तीन जणांनी संपर्क साधला. त्यांना एक मोबाईल क्रमांक सांगून तो तुमच्या नावे आहे व त्या क्रमांकावरून त्रास देण्यासह महिलेला अश्लील व्हिडिओ पाठविल्याचे त्यांना सांगण्यात आले. यावरून तुमच्याविरुद्ध बांद्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून तशी नोटीस त्यांना व्हाटसअॅपद्वारे पाठविली.
गुन्ह्याची नोटीस पाठविण्यासह त्यांच्या बँक खात्यावरून मनी लाँड्रीगचे व्यवहारही झाल्याचे डॉक्टरांना सांगण्यात आले. यामध्ये २५ लाख रुपये घेऊन तुम्ही तुमचे बँक खाते नरेश गोयल नामक व्यक्तीला विकले असून त्या खात्यावर दोन कोटी जमा झाले आहे. त्याचप्रमाणे नरेश गोयलविरुद्ध इनफोर्समेंट डिपार्टमेंटची नोटीस, आरटीजीएसची पावती, सीबीआयची मनी लाँड्रींग व ड्रग्स स्मगलिंगची नोटीस डॉक्टरांना पाठविली. या मनी लाँड्रींगमध्ये नरेश गोयल याला अटक केली असून त्याला तुम्ही बँक खाते विकल्याचे त्यांना सांगण्यात आले होते.
डॉक्टर उगले यांना सर्व बनावट कागदपत्र त्यांच्या व्हॉट्सअॅपवर पाठविण्यात आले. तसेच व्हिडिओ कॉल बंद करून कोठेही जायचे नाही, तुम्हाला अटक करण्यात येईल. त्यामुळे तुमची प्रतिष्ठा देखील जाईल अशी भीती त्यांना दाखविण्यात आली. या भितीपोटी सायबर ठगांनी त्यांच्याकडून वेळोवेळी ३१ लाख ५६ हजार ६४ रुपये ऑनलाईन उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. दिगंबर उगले यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर ठगांकडून वेगवेगळ्या फंड्याद्वारे फसवणूक केली जात असल्याने सध्या दररोज याविषयी प्रत्येक कॉलच्या कॉलर ट्यूनद्वारे जनजागृती केली जात आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांनी बँकांना पत्र देऊन ही रक्कम रोखण्यासाठी पत्र दिले आहे.