जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२५
राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच अहिल्यानगर जिल्ह्यातील बोधेगाव येथे पैलवान बाबा मंदिरातील 26 जानेवारीपासून बेपत्ता असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे यांचा निर्घृण खून झाल्याचे उघड झाले असून, रात्री त्यांचे शीर एका विहिरीत सापडले, तर शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दुसर्या विहिरीत उर्वरित धड सापडले. या घटनेमुळे बोधेगाव भागात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, बोधेगाव येथील पहिलवान बाबामंदिर गावापासून सुमारे तीन किलोमीटरवर एकबुर्जीलगत असून मंदिरात गेल्या 14 वर्षांपासून सेवा करत असलेले पुजारी नामदेव रामा दहातोंडे हे 26 जानेवारीपासून बेपत्ता झाले होते. त्यासंदर्भात एकनाथ घोरतळे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांचा शोध सुरू असतानाच गुरुवारी रात्री मंदिराजवळच्या सुशीलाबाई पाटीलबा तांबे यांच्या विहिरीजवळ दुर्गंधी येऊ लागल्याने काही जणांनी विहिरीत पाहिले असता दहातोंडे यांचे मुंडके आढळून आले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ते रात्री विहिरीबाहेर काढले. या घटनेमुळे खळबळ उडाली. ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला.
जिल्हा पोलिसप्रमुख राकेश ओला, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, शेवगाव विभागाचे उपअधीक्षक सुनील पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, ठसेतज्ज्ञ आदी पथक शुक्रवारी दुपारी घटनास्थळी दाखल झाले. या हत्येचा शोध घेत असतानाच शुक्रवारी सायंकाळी मंदिरापासून काही अंतरावर अविनाश कदम यांच्या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्याने पाहणी केली असता दहातोंडे यांचे उर्वरित शरीर आढळून आले. या घटनेमुळे बोधेगाव भागात एकच खळबळ उडाली आहे. दहातोंडे मूळ नागलवाडी (ता शेवगाव) येथील रहिवासी आहेत. त्यांच्या मागे पत्नी, दोन विवाहित मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
या घटनेचा सखोल तपास करून हल्लेखोरांना तातडीने अटक करावी व या गंभीर घटनेचा तपास एलसीबीकडे देण्यात यावा या मागणीसाठी विविध संघटनांनी बोधेगावात शनिवारी कडकडीत बंदचे आवाहन केले आहे. या प्रकरणी संशयित म्हणून एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही क्रूर हत्येबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.