मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना फोन करून चर्चा केल्याची माहिती मिळाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे शिंदे गटाशी मनसे हातमिळवणी करणार, असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. यावर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटलांनी सूचक विधान केले आहे. मनसेची शिंदे गटाशी जवळीक होऊ शकते. पण सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरे यांचाच असल्याचे सूचक विधान पाटील यांनी केले. मनसे-भाजपच्या युतीनंतर आता मनसे व शिंदे गट युती होते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यात सत्तासंघर्ष सुरू आहे. शिंदे हे आपला गट एखाद्या राजकीय पक्षात विलीन करतील, अशी चर्चा आहे. त्यातच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत शिंदे यांनी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली. यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत राजू पाटील म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून मी राजसाहेबांच्या संपर्कात नाही. प्रसारमाध्यमांच्या मार्फतच मला हे समजले आहे, की राजसाहेब यांना एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्यांचे पहिल्यापासून एकमेकांशी चांगले संबंध आहेत. मध्ये काही नेतृत्वाच्या अडचणी असतील त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. यावेळी त्यांनी एक कॉल केला असेल. सध्या जे राजकारण सुरू आहे, ते पाहता शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा अंतर्गत वाद आहे. त्यामुळे या घडीला आम्हाला त्याच्यात काही रस नाही, असे राजू पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना धक्का देत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना गळाला लावले. याला अनेक कारणे आहेत. परंतु त्यातील एक कारण म्हणजे त्यांनी सांगितलेला हिंदुत्वाचा मुद्दा. जो मुद्दा आम्ही राजसाहेबांच्या माध्यमातून उचलून धरला आहे. हे काही कॉमन मुद्दे आहेत, त्या अनुषंगाने जवळीक होऊसुद्धा शकते. परंतु सर्वस्वी निर्णय हा राजसाहेबांवरच अवलंबून आहे, असे पाटील म्हणाले.




















