जळगाव मिरर | १७ फेब्रुवारी २०२५
गेल्या चार दिवसापासून राज्यातील प्रत्येक चित्रपटगृहात ‘छावा’ चित्रपट बघण्याची मोठी रीघ लागली असताना ‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आला. तसेच त्यातील मुख्य भुमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच विकी कौशल तसेच येसुबाईंची भुमिका साकारणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी अनेक मेहनत घेऊन त्यांची भुमिका पार पाडली आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकाला हा चित्रपट पाहता आला पाहिजे यासाठी नगर शहर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी खास सर्वसामान्य महिलांसाठी मल्टीप्लेक्स थेटरमध्ये मोफत चित्रपट पाहण्याची सोय केली आहे. याने सर्व महिलांना चित्रपटाचा मोफत लाभ घेता येणार आहे. हा चित्रपट महिला सोमवारपासून ते रविवार पर्यंत मोफत पाहू शकतात. तसेच ‘छावा’ चित्रपट हा कर मुक्त करावा अशी मागणीही आमदार संग्राम जगताप यांनी केली आहे. ही सुविधा तुम्हाला फक्त अहिल्यानगरमध्ये मिळणार आहे.