जळगाव मिरर | २५ फेब्रुवारी २०२५
राज्यात सध्या ‘छावा’ चित्रपट सध्या धुमाकूळ घालत असतांना चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमुळे प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी चित्रपटगृहाच्या बाहेर पडत आहे. ‘छावा’ सिनेमासोबतच अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील शेवटाबाबत काही प्रश्न उपस्थित केले गेले. यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी खुलासा केला आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखवण्याचा माझ्यावर माध्यमांचा दबाव होता, असे अमोल कोल्हे म्हणालेत.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा सीन दाखवण्यात आला आहे. मात्र ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत तो सीन दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे या मालिकेचा शेवट गुंडाळण्यात आला का? मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्या संदर्भात कुणाचा दबाव होता का? यामध्ये काही राजकीय हेतू होता का? आणि ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ महाराजांचा अंत न दाखवण्यामागे शरद पवारांची काही विशेष सूचना होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी एका व्हिडिओद्वारे या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
काय म्हणाले अमोल कोल्हे? ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका संपून आता पाच वर्षांहून अधिकचा काळ लोटला. तरीही ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. या यशात चाहत्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या थिएटरमध्ये असलेला छावा चित्रपट अतिशय उत्तम आहे. तो पाहण्याचे मी आवाहन केलेले आहेच. यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचा अनेक वर्ष दडवलेला इतिहास समोर येत आहे. अंधाऱ्या कोठडीत डांबला गेलेला इतिहास यानिमित्ताने उजळून निघाला. पण सोशल मीडियावर काही ठराविक अंधभक्तांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या हेतूविषयी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. मी या ट्रोलर्सना फारशी किंमत देत नाही. पण मालिकेच्या हेतूविषयी प्रश्न उपस्थित केल्यामुळे उत्तर देणे भाग वाटते.
डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचा शेवट विशिष्ट पद्धतीने दाखविण्याचा माझ्यावर माध्यमांचा दबाव होता. मालिका टीव्हीवर दाखवायची असल्यास नियमावलीचे पालन करणे बंधनकारक असते. त्या नियमांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव आला. नैतिकतेचाही माझ्यावर दबाव होता. सलग चाळीस दिवस टीव्ही मालिकेवर महाराजांचे बलिदान दाखवले असते तर प्रत्येक कुटुंबातील आबालवृद्धांवर याचा परिणाम झाला असता. हा विचार आम्ही करणे गरजेचे होते.





















