मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा माघारी येण्याचं आवाहन केलं आहे. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे, असे भावनिक आवाहन उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले आहे. मात्र माघारी येण्याचे आवाहन केल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि मुख्य प्रवक्ते शिवसैनिकांना खालच्या पातळीतील शब्दांमधून अपमान करत आहेत. तर दुसरीकडे याच शिवसैनिकांना समेटाची हाक दिली जात आहे, याचा काय अर्थ घ्यायचा?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारला आहे.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबां च्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी महाविकास आघाडीचे सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय? असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा असं उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या भावनिक आवाहनाला शिंदे यांनी ट्विटरवरुन उत्तर देताना उद्धव ठाकरेंचे पुत्र म्हणजेच मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणजेच संजय राऊत हे बंडखोर आमदारांविरोधात वादग्रस्त भाषा वापरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनाच प्रश्न विचारला आहे.





















