जळगाव मिरर | ११ मार्च २०२५
राज्यातील महायुती सरकारमध्ये अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी देखील आहे. यात आता येत्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. या रिक्त जागांसाठी २७ मार्चला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. यामुळे प्रत्येक इच्छुकांनी विधानपरिषदेवर जाण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. या जागांवर कोणाची वर्णी लागणार याची मोठी उत्सुकता लागलेली आहे.
विधानपरिषदेच्या पाच जागांपैकी भाजपला ३, शिवसेना १ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा दिली जाणार आहे. पाच जागांवर मतदान झाल्यास निवडून येण्यास मतांचा कोटा ५७ आहे. मात्र, मविआतील तिन्ही पक्षाकडे एकत्रित मतांची बेरीज केली तरीही त्यांची मते ५७ होत नाहीत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधानपरिषदेवर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कुणाला संधी देणार हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र या निवडणुकीआधी अजित पवारांची डोकेदुखी वाढली असून राष्ट्रवादीच्या एका जागेसाठी 100 पेक्षा जास्त विनंती अर्ज आले आहेत.
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या इच्छुकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १०० जणांनी विनंती अर्ज केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या दोन विधान परिषदेच्या जागा आहेत. त्यापैकी एक जागा राज्यपाल नियुक्त कोट्यातून पक्षाला मिळणार आहे. तर दुसरी जागा विधान परिषदेमध्ये आमदारांमधून निवडून जाणारी जागा आहे. त्यासाठी देखील इच्छुकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
झिशान सिद्दिकी यांना राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना विधानसभेत उमेदवारी दिली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर ते विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळत आहे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पक्षाकडे या जागेसाठी विनंती केली आहे. तर संग्राम कोते पाटील यांच्यासह अनेक इच्छुकांनी या जागेसाठी विनंती केली आहे. मात्र जागा एक आणि इच्छुकांची संख्या जास्त असल्याने अजित पवारांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य असलेल्या पाच आमदारांनी राजीनामा दिल्याने या जागा रिक्त झाल्या होत्या. नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमश्या पडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपिचंद पडळकर हे विधान परिषदेतील आमदार विधानसभेवर निवडून गेले होते. विधानसभेवर निवड झाल्यानंतर या पाचही जणांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पाच जागांसाठी आता २७ मार्चला निवडणूक होणार आहे.